बाबा रिटायर होतोय...

आज माझंच मला कळून चुकलं,
मलाच नातं नीट जपता आलं नाही..

आज जेवून झाल्यावर बाबा बोलले,
मी आता रिटायर होतोय...
मला आता नवीन कपडे नको,
जे असेल ते मी जेवीन,
रोज वाचायला पेपर नको,
आजपासून सर्व व्यसन बंद,
जसा ठेवाल तसा राहीन...

काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं
आणि टचकन पाणी डोळ्यात यावं,
काळीजचं तुटावं, अगदी तसंच झालं...

एवढंच कळलं की आजवर जे जपलं
ते सारंच फसलं..
का बाबांना वाटलं तो ओझं होईल आमच्यावर ?

मला त्रास होईल जर ते गेले नाही कामावर ?
ते घरात राहिले म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल,
की त्यांची घरातली किंमत शून्य बनेल.
आज का त्यांनी दम दिला नाही,
काय हवं ते करा माझी तब्येत बरी नाही,
मला कामावर जायला जमणार नाही..

खरं तर हा अधिकार आहे त्यांचा सांगण्याचा,
पण ते काकुळतीला का आले ?
ह्या विचारातच माझं मन खचलं..

नंतर माझं उत्तर मला मिळालं,
जसा जसा मी मोठा होत गेलो,
बाबांच्या कवेत मावेनासा झालो.
नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं,
त्याचबरोबर वाढत होता तो अहंकार,
आणि त्याने वाढत होता तो विसंवाद,
आई जवळची वाटत होती,
पण बाबांशी दुरावा साठत होता..

मनाच्या खोल तळापर्यंत प्रेमच प्रेम होतं,
पण ते शब्दात सांगताच आलं नाही,
बाबांनीही ते दाखवलं असेल,
पण दिसण्यात आलं नाही..

मला लहानाचं मोठं करणारे बाबा,
स्वतःच स्वतःला लहान समजत होते.
मला ओरडणारे - शिकवणारे बाबा,
का कुणास ठाऊक बोलताना धजत होते.

मनाने कष्ट करण्यास तयार असलेल्या बाबाला,
शरीर साथ देत नव्हतं.
शून्यातून सारं उभं केलेल्या त्या बाबाला,
घरात नुसतं बसू देत नव्हतं.
हे मी नेमकं ओळखलं.

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,
सांगायचं होतं त्यांना, की थकले आहात तुम्ही,
आराम करा. पण,
आपला अधिकार नव्हे सूर्याला सांगायचा की मावळ आता...

लहानपणीचे हट्ट पुरवणारे बाबा,
मधल्या वयात अभ्यासासाठी ओरडणारे बाबा,
आणि नंतर चांगलं वागण्यासाठी कानउघडणी करणारे बाबा,
आजवर सारं काही देऊन जेव्हा खुर्चीत शांत बसतो,
तेव्हा वाटतं की काही जणू आभाळचं खाली झुकलं...

कधीतरी या आभाळाने जवळ बोलवावं..
खूप काही बोलावं वाटतं,
पण तेव्हा लक्षात येतं, आभाळ कधीच झुकत नाही,
ते झुकल्यासारखे वाटतं...

आज माझंच मला कळून चुकलं,
आभाळाची छत्रछाया ही खूप काही देऊन जाते...

जगातील सर्व बाबांना त्रिवार मानाचा मुजरा...


Comments