बाबा रिटायर होतोय...
आज माझंच मला कळून चुकलं, मलाच नातं नीट जपता आलं नाही.. आज जेवून झाल्यावर बाबा बोलले, मी आता रिटायर होतोय... मला आता नवीन कपडे नको, जे असेल ते मी जेवीन, रोज वाचायला पेपर नको, आजपासून सर्व व्यसन बंद, जसा ठेवाल तसा राहीन... काहीतरी कापताना सुरीने बोट कापलं जावं आणि टचकन पाणी डोळ्यात यावं, काळीजचं तुटावं, अगदी तसंच झालं... एवढंच कळलं की आजवर जे जपलं ते सारंच फसलं.. का बाबांना वाटलं तो ओझं होईल आमच्यावर ? मला त्रास होईल जर ते गेले नाही कामावर ? ते घरात राहिले म्हणून कोणी ऐतखाऊ म्हणेल, की त्यांची घरातली किंमत शून्य बनेल. आज का त्यांनी दम दिला नाही, काय हवं ते करा माझी तब्येत बरी नाही, मला कामावर जायला जमणार नाही.. खरं तर हा अधिकार आहे त्यांचा सांगण्याचा, पण ते काकुळतीला का आले ? ह्या विचारातच माझं मन खचलं.. नंतर माझं उत्तर मला मिळालं, जसा जसा मी मोठा होत गेलो, बाबांच्या कवेत मावेनासा झालो. नुसतं माझं शरीर वाढत नव्हतं, त्याचबरोबर वाढत होता तो अहंकार, आणि त्याने वाढत होता तो विसंवाद, आई जवळची वाटत होती, पण बाबांशी दुरावा साठत होता.. मनाच्या खोल तळापर्यंत...